Home Breaking News दालमिया कंपनीतील त्या रासायनिक अपघाताची तत्काळ चौकशी करा..! ◾गंभीर जखमींना ५०...

दालमिया कंपनीतील त्या रासायनिक अपघाताची तत्काळ चौकशी करा..! ◾गंभीर जखमींना ५० लाख रुपये द्या ◾बंडू हजारे यांची पत्रपरिषदेत मागणी

0
35

 

चंद्रपूर,( ता.प्र ) : जिल्ह्यातील नारंडा तालुका कोरपणा येथे स्थित दालमिया सिमेंट कंपनीमध्ये दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टँकर अनलोडिंग प्रक्रियेदरम्यान गंभीर औद्योगिक अपघात घडला. 

या दुर्घटनेत दोन कंत्राटी कामगार स्वाती लक्ष्मण उईके वय २५, रमानगर, चंद्रपूर व अक्षय विजय कन्नाके रा. नारंडा, तालुका कोरपणा हे गंभीर रासायनिक भाजल्यामुळे जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये मुलीची प्रकृती चिंताजनक असून दोन्ही जखमींवर योग्य ते उपचार करावे तसेच दोघांच्याही कुटूंबाला ५० लाखांची मदत करावी. त्याचप्रमाणे दालमिया कंपनीची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पत्रपरिषदेत केली.

 

नारंडा येथील दालमिया कंपनीमध्ये २५ फेब्रुवारी रोजी सल्फूरिक अ‍ॅसिड हे अतिशय धोकादाय रसायन लोडिंग करतांना तिचा नोडर बाहेर आल्याने तो येथे कार्यरत कंत्राटी कामगार स्वाती उईके आणि अक्षय कन्नाके यांच्या अंगावर उडाला.

यामध्ये स्वाती व अक्षयचा पाठीमागचा भाग गंभीररित्या भाजल्या गेला. यात स्वातीची प्रकृती चिंताजनक असून एका घटनेमुळे तिच्या आयुष्यासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. परंतू कंपनी प्रशासनाने दोघांनाही किरकोळ जखमी असल्याचे सांगितले. हा त्यांच्यावरील अन्याय असून अश्यावेळी दोन्ही कुटूंबांना तत्काळ कंपनीकडून ५० लाखांची मदत करण्यात यावी, कंपनीची चौकशी व्हावी व जखमी कुटूंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नोकरी मिळावी अशी मागणी बंडू हजारे यांनी यावेळी केली. ७ दिवसाच्या आत सदर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने कंपनीच्या गेटसमोर शिवसेना शिंदे तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी बंडू हजारे यांनी दिला.

 

यावेळी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या यामध्ये जिल्हास्तरीय उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, फॅक्टरी निरीक्षक, कामगार विभाग, एमपीसीबी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संयुक्त तपासणी करावी,एसओपी, पिपिई वितरण सेफ्टी ऑडिट रिपोर्ट व सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे, जखमी कामगारांना तात्काळ आर्थिक मदत व कायदेशीर नुकसानभरपाई द्यावी,दोषींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हा नोंद करावा, संपूर्ण प्लांटचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा, प्रत्येक जखमी कामगारास किमान ५० लाख नुकसानभरपाई,संपूर्ण वैद्यकीय खर्च कंपनीकडून उपचार कालावधीत पूर्ण वेतन, कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास अतिरिक्त विशेष भरपाई, कुटुंबातील एका सदस्यास कायमस्वरूपी नोकरी या व अश्या अनेक मागण्या यावेळी बंडू हजारे यांनी केल्या. सदर पत्रपरिषदेला युवराज धानोरकर व राजेश राठोड यांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here