चंद्रपूर, दि. 17: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर मार्फत डेबु सावली वृद्धाश्रमात 1 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भिष्म यांच्या हस्ते निराधार योजने अंतर्गत 16 वृद्धांना मंजुरी आदेश देण्यात आला होते. परंतू बँकेत खाते नसल्यामुळे व तांत्रिक अडचणीमुळे संबंधिताना सदर रक्कम प्राप्त झाली नसल्याबाबत प्राधिकरणास कळविण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी पुढाकार घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाचे (जटपुरा गेट शाखा) शाखा अधिकारी मनोज काठवते आणि तहसील कार्यालय, चंद्रपूर यांच्याशी समन्वय साधून तांत्रिक अडचणी दूर केल्या. त्यानुसार पात्र 16 वृद्धांच्या खात्यामध्ये निराधार योजनेचे लाभ स्वरूपात रक्कम जमा झाली आहे. यापुढे दरमहा रक्कम 1500/- खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे सर्व वृद्धांनी प्राधिकरणाच्या कामाचे कौतुक केले आणि आभार मानले. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.