ना. श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीला महाराजा श्री अग्रसेन यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘अशा प्रसंगांना समाजातील सर्व लोक एकत्र येतात तेव्हा आनंद होतो. कारण याठिकाणी संवादाच्या माध्यमातून विचारांचे आदान प्रदान होत असते. ‘मॅन इज ए सोशल एनिमल ते मॅन इज ए सेल्फीश एनिमल’ असा मनुष्याचा प्रवास झाला आहे. त्यामुळे या काळात एकत्र येऊन संवाद साधणे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे आज अग्रसेन समाजातील बांधव एकत्र आलेत याचा विशेष आनंद आहे.’ ‘पूर्वी तंत्रज्ञानाचा अभाव होता पण सुखाचा प्रभाव होता. आता मोबाईल हाती आला आहे. कुटुंबातील लोक एकत्र आले तरीही मोबाईलमुळे लांब असल्यासारखे वाटतात. आज तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा प्रभाव आहे, पण आनंदाचा, सुखाचा आणि आपलेपणाचा अभाव आहे. अशा कार्यक्रमांतून हा आपलेपणा वाढतो,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखे भारतात आणण्यासाठी करार करण्याकरिता मी लंडनला गेलो होतो. तेथील भारतीय लोकांना भेटल्यावर मला एका गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. आपण भारतात राहून आपल्या भारतीय संस्कारांची जेवढी चर्चा करत नाही, त्यापेक्षा जास्त पटींनी तेथील भारतीय आपल्या संस्कारांच्या बाबतीत आग्रही आहेत. त्यानंतर जपानमध्ये कोबे शहरात गेलो होतो. तिथे दिडशे वर्षांपूर्वी भारतीय नागरिक मोत्यांचा व्यापार करायला आले. त्यांच्यातील आजच्या तरुण पिढीला भेटलो, तर भगवद्गीतेतील श्लोक त्यांना अतिशय सहजतेने म्हणताना बघितले. जपान आणि लंडनमध्ये राहून तेथील भारतीय संस्कारांबद्दल आग्रही आहेत, याचा अभिमान वाटतो,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
‘अग्रसेन भवन ही फक्त इमारत नाही’
अग्रसेन भवनाबद्दल बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘अग्रसेन भवन फक्त विटा आणि सिमेंटने उभी झालेली एक साधी इमारत नाही. हे समाजाचे, संस्कारांचे भवन आहे. याठिकाणी समाजातील तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सारे एकत्र येऊन समाजाच्या कल्याणाचा विचार करणार आहेत. याठिकाणी आपलेपणाचा, प्रेमाचा भाव निर्माण होणार आहे.’