घंटागाडी कामगार यांच्या मागण्या मान्य, संप मागे घेण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन कामगारांना आवाहन

0
18

चंद्रपूर १२ ऑक्टोबर: कचरा संकलन आणि वाहतुक या अत्यावश्यक सेवेत कंत्राटी तत्वावर काम करणारे घंटागाडी कामगार ६ ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आपल्या कुटुंबाचे भवितव्य बघता कामगारांनी संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत पत्र दिले आहे. याबाबतीत १० ऑक्टोबर रोजी उपायुक्त यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली होती. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, ३० मजुरांना पुन्हा कामावर घेणे आणि वेतन चिट्ठी नियमित देणे यांचा समावेश आहे.

झालेल्या चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने कामगारांच्या पुढील मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

१) जुने कंत्राटदार जे वेतन देत होते त्यानुसार वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल.

२) जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल.

३) जे ३० कामगार कामावरून कमी करण्यात आले होते त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात येईल व वेतन चिट्ठी नियमित देण्यात येण्याचे देखील मान्य करून तसे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहे.

स्वच्छता सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने शहरातील नागरिकांची भविष्यात कुठलीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने कामगारांनी संप मागे घेऊन नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here