![]()
![]()
चंद्रपूर, 12 ऑगस्ट: देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचा आणि त्यांच्या वारसांचा सातत्याने अवमान केला जात असून, या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता महात्मा गांधी पुतळा, जटपुरा गेट, चंद्रपूर येथे भारत सरकारकडून मिळालेल्या सन्मानपत्रांची होळी करण्यात येणार आहे. ही माहिती स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य संजय वैद्य आणि अन्य पाल्यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून केवळ 75 वर्षे झाली असताना सरकारकडून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पद्धतशीरपणे पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची दुरवस्था, हयात असलेल्या सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना ही या प्रवृत्तीची साक्ष आहे.
संजय वैद्य यांनी यावेळी 9 ऑगस्टला साजरा होणाऱ्या ‘ऑगस्ट क्रांती दिना’च्या सरकारकडून झालेल्या दुर्लक्षाचा देखील उल्लेख केला. हा दिवस स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा टप्पा असूनही कोणतेही शासकीय कार्यक्रम झाले नाहीत. ही गोष्ट दुर्दैवी असून, सरकारचा हेतू संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले. तसेच, भारत भेटीवर येणाऱ्या विदेशी राष्ट्रप्रमुखांना राजघाट वा इतर स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित ठिकाणी न नेण्याच्या धोरणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सरकारच्या या धोरणाने व्यथित होऊन, आम्ही आमच्या पालकांना मिळालेल्या सन्मानपत्रांची होळी करून सरकारच्या भूमिकेचा निषेध करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका पाल्यांनी या वेळी मांडली. या पत्रकार परिषदेला महेश काहीलकर, दिवाकर बनकर आदी पाल्यही उपस्थित होते.


