चंद्रपूर: चैन्नई-गया या साप्ताहिक ट्रेनचा (१२३९०) थांबा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अथक प्रयत्नाने चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर मंजूर झाला असून दि. १८ मार्च रोजी ही ट्रेन रात्री ११:४५ वाजता चांदा फोर्टवर पहिल्यांदाच थांबणार असल्याने चंद्रपूर व जिल्ह्यातील प्रवाशांना या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे.
ट्रेन नं. १२३८९ गया-चैन्नई या परतीच्या प्रवासाचा थांबा चांदा फोर्ट येथे मंजूर झालेला नसला तरी लवकरच हा थांबाही मंजूर केला जाईल. त्याकरिता रेल्वेच्या वरिष्ठांना अहीर यांनी कळवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची सुचना केली आहे. सदर ट्रेनचा बल्लारपूर रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करून बल्लारशाह गाठावे लागत होते. चैन्नई-गया ट्रेनचा चांदा फोर्ट स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांची होत असलेली फरफट थांबणार आहे.
ट्रेन नं. १२३९० चा चांदा फोर्टला थांबा मिळाल्याने बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मधील मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापारी, व्यवसायी, कर्मचारी, विद्यार्थी व अन्य प्रवाशांनाही या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. गया-चैन्नई ही ट्रेन चांदा फोर्ट वरून रात्रीच्या वेळेस जात असल्याने ट्रेन नं. १२३८९ चा थांबाही चांदा फोर्टवर मंजूर करणे प्रवाशांच्या दृष्टीने अनिवार्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने परतीचा प्रवास करणाऱ्या गया-चैन्नई या ट्रेनचा सुध्दा चांदा फोर्ट स्थानकावर त्वरीत थांबा मंजूर करून प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेने हंसराज अहीर यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
चैन्नई-गया (ट्रेन नं. १२३९०) या साप्ताहिक ट्रेनचा चांदा फोर्ट स्थानकावर थांबा मंजूर करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमणिकभाई चव्हान, कार्याध्यक्ष तथा झेडआरयुसीसीचे सदस्य दामोदर मंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या वतीने हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले आहे.