![]()
चंद्रपूर, दि. 25: आपल्या उपजीविकेसाठी बुरड कारागीर, बांबूच्या परंपरागत वस्तू तयार करीत असतात. परंतु त्यामानाने त्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळेच त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी बुरड कारागिरांमध्ये आधुनिकता व तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बुरड कारागिरांसाठी वन अकादमी येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 10 टप्प्यात घेण्यात येत असून त्यामध्ये एकूण 300 बुरड कारागिरांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.
![]()
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 24 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले. यावेळी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, वनअकादमीचे सत्र संचालक श्री. दहिवले तसेच बुरड कारागीरांची उपस्थिती होती.
यावेळी संचालक एम.एस.रेड्डी यांनी प्रशिक्षणास उपस्थित बुरड कारागीरांच्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा केली. तसेच सामुहिक वनहक्क कायद्याअंतर्गत उपलब्ध क्षेत्रात बांबू लागवड, निष्कासन व त्याचे नियमन ग्रामसभेमार्फत करून नियमित बांबू उपलब्धतेकरिता बांबू कारागिरांच्या सहकारी संस्था स्थापन करण्याविषयी सूचित केले. पारंपारिक वस्तू बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्यवर्धित बांबू वस्तूचे उत्पादन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बी.आर.टी.सी.चे संचालक अशोक खडसे यांनी प्रशिक्षणाबरोबरच अत्याधुनिक यंत्रसामुग्री कारागीरांकरिता उपलब्ध करून देण्याबाबत तसेच त्यासाठी विविध संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यासाठी बी.आर.टी.सी. प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी प्रशिक्षणार्थी बुरड कारागिरांना आधुनिक यंत्रसामुग्रीचा समावेश असलेली टूलकीट मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. सदर प्रशिक्षणाची संकल्पना चंद्रपूर वनअकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी यांची आहे. सदर प्रशिक्षणार्थींना अंतिक मल्लिक, किशोर गायकवाड या प्रमुख बांबू शिल्पकारांच्या मार्गदर्शनात संतोष बजाईत, संध्या मेश्राम व गोविंदा आत्राम या तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षण हे चंद्रपूर जिल्ह्यातील बुरड कारागीरांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.


