पंतप्रधानांच्या हस्ते जिल्ह्यातील 15 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन मोरवा येथील युनिको कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात जिल्हास्तरीय आयोजन

0
23

चंद्रपूर, दि. 19 : आजच्या तरुण – तरुणींना शिक्षणासोबतच कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 15 केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम मोरवा येथील त्रिनेत्र पदूम कृषी व ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत युनिको कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे पार पडला.

 

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवि मेहंदळे, नामदेव डाहूले, अनिल डोंगरे, युनिको कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे राजू विश्वास, गटनिदेशक बंडोपंत बोडेकर, श्रीराम मगर यांच्यासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील 511 तर चंद्रपूर जिल्ह्यातील 15 गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून युवक आणि युवतींचे रोजगाराभिमुख कौशल्य वाढण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. या केंद्राचा ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, जेणेकरून आपल्या गावाची, जिल्ह्याची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल. तसेच आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.

 

उद्घाटन झालेली जिल्ह्यातील ग्रामीण विकास कौशल्य केंद्र : कोठारी (ता. बल्लारपूर), चंदनखेडा (ता. भद्रावती), गांगलवाडी (ता.ब्रह्मपुरी), मोरवा (ता.चंद्रपूर), नेरी (ता.चिमूर), भंगाराम तळोधी (ता.गोंडपिपरी), शेनंगाव (ता.जिवती), नांदाफाटा (ता.कोरपना), राजोली (ता.मुल), तळोधी बाळापूर (ता.नागभीड), देवाडा खु., (ता.पोंभुर्णा) विरुर (ता.राजुरा), मोखाळा (ता.सावली), नवरगाव (ता.सिंदेवाही) आणि शेंगाव (ता.वरोरा)

 

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, जगात भारतातील कार्यक्षम आणि प्रशिक्षित युवकांची मागणी वाढली आहे. बांधकाम, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, वाहतूक व संदर्भीय सेवा या क्षेत्रात विशेष मागणी आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण तरूणी रोजगाराभिमुख प्रशिक्षित होतील. महाराष्ट्रात बांधकाम आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठे काम असल्यामुळे भविष्यातही अनेक केंद्र स्थापन होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने लघु प्रशिक्षणाकडेसुध्दा लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी प्रशिक्षणाचे ऑनलाईन सत्र आयोजित करावे. प्रशिक्षित लोकांना उद्योगांचे प्रथम प्राधान्य असते. भारतात केंद्र सरकारने कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून वेगळे बजेट त्यासाठी दिले आहे. कौशल्य विकासाचा सर्वाधिक लाभ गरीब कुटुंबांना होतो. केंद्र सरकारने पी.एम. विश्वकर्मा योजना सुरू केली असून यासाठी 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातून ही योजना पुढे जाणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here