देशाचे माजी पंतप्रधान आणि आदर्श नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे एक महान व्यक्तिमत्त्व देशाने गमावले आहे. त्यांचा मृत्यू ही देशासाठी मोठी हानी असून साधेपणा आणि तत्त्वनिष्ठतेचे मूर्तिमंत प्रतीक कायमचे हरपले असल्याची प्रतिक्रिया शोकसंदेशाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
शोकसंदेशात आ. जोरगेवार यांनी म्हटले की, डॉ. मनमोहन सिंग हे एक दूरदर्शी अर्थतज्ञ, शांत आणि संयमी नेता होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक सुधारणा, औद्योगिक विकास आणि जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली. अर्थमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. पंतप्रधान म्हणून त्यांनी दिलेली सेवा नेहमीच देशवासीयांच्या स्मरणात राहील.
त्यांचे साधेपण, प्रामाणिकपणा आणि तळमळीची समाजसेवा ही आजच्या पिढीला प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक शांत, संयमी आणि अभ्यासू नेता हरपला आहे. या दुःखद प्रसंगी, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही आपल्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना माता महाकालीच्या चरणी करत असल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.