चंद्रपूर, दि. 5 : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्ट प्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे प्रलोभन दिल्याप्रकरणी तसेच कुटीचे बांधकाम न करता 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्सचा मालक भरत नानाजी धोटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत धोटे याने मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतिश पोद्दार यांच्या ले-आऊटवर तसेच चांदा रयतवारी येथील ले-आऊट वरील गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याने संबंधित प्लॉटधारकांनी या संदर्भातील कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोपी भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या माध्यमातून मौजा पद्मापूर, अजयपूर, तळोधी (तुकूम), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करून सदर कुटी युनिव्हर्स ॲग्रो टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा करण्याचे आमिष दाखविले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह 7083 रुपये देण्याचे प्रलोभन दाखवून प्रत्येक गुंतवणूकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सर्व पिडीत अन्यायग्रस्तांतर्फे अशोक पांडूरंग भटवलकर, रा. म्हाडा कॉलनी, दाताळा यांच्या लेखी रिपोर्टवरून 19 डिसेंबर 2022 रोजी भरत धोटेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून या तपासात आरोपी भरत नानाजी धोटे याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतीश पोद्दार यांचे सर्व्हे क्रमांक 76/3 आणि 76/4 तसेच मौजा चांदा रयतवारी भुमापन क्रमांक 415/1 व 416 येथे सुध्दा ले-आऊट तयार करून प्लॉटच्या विक्रीकरीता सदर ग्राहकांसोबत 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर विसारपत्र केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित ले-आऊटमधील प्लॉट घेण्याकरीता विसारपत्र करणा-या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले संबंधित प्लॉटचे विसारपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे बातमी प्रकाशित झाल्यापासून 8 दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी केले आहे.