Home Breaking News ग्रामीण भागात राबविणार विकासाची पंचसूत्री – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ...

ग्रामीण भागात राबविणार विकासाची पंचसूत्री – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पिंपळखुट येथे ग्रामपंचायत भवनाचे भुमिपूजन; झरी येथे रिसॉर्टचे लोकार्पण

0
66

चंद्रपूर, दि. 26 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र दिला आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तर आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीला जाईल, याची जाणीव ठेवूनच केंद्र व राज्य सरकारने ग्राम विकासाला प्राधान्य दिले आहे. हाच धागा धरून ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन आणि रोजगाराच्या विकासाची पंचसूत्री राबविण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 

चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट येथे नवीन ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, रामपालसिंग, नामदेव डाहुले, चंद्रकांत डोंगरे, गौतम निमगडे, विलास टेंभुर्णे, अशोक आलाम, कविता जाधव यांच्यासह परिसरातील गावांचे सरपंच उपस्थित होते.

 

ग्रामीण भागात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत शेतीचा सर्वांगिण विकास आणि पाणंद रस्त्यांबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या परिसरात अंगणवाडी, जि.प.शाळा, सिमेंट रस्ते व इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात आरोग्याच्या उत्तम सुविधा, गुणवत्तापूर्वक शिक्षण, सिंचनाच्या सोयी, रोजगाराची उपलब्धता या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांचे बांधकाम उत्तम असावे, हेच आपले मिशन आहे. विकासाच्या बाबतीत गाव आदर्श होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. अधिका-यांनीही जनतेला सन्मानाची वागणूक द्यावी, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

यावेळी प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, गाव आदर्श होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अनेक योजना आहेत. महिला शिक्षित तर गाव व समाज शिक्षित होतो. जिल्ह्यातील महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असून त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. तसेच गावांमध्ये पाणंद रस्ता खडीकरणाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here