चंद्रपूर- कांतीकारी शहीदवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके ऐतिहासीक वारसा लाभलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव असून त्यांचे हौतात्म्य व राष्ट्रसमर्पित कर्तृत्व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील अशा गौरवपूर्ण शब्दात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शहीद दिनानिमित्त आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात शेडमाके यांच्या स्मृतीस आदरांजली वाहीली.
जिल्हा कारागृहातील पवित्र शहीदस्थळी शहीद दिनाचे औचित्य साधून दि. 21 ऑक्टोंबर रोजी आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात उपस्थित आदिवासी बांधव व अन्य नागरीकांना संबोधित करतांना ते बोलत होते. या प्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, बाबुराव शेडमाके समितीचे पदाधिकारी गुलाब मसराम, श्याम गेडाम, विठ्ठल कुमरे, गणेश गेडाम, बाबुराव जुमनाके, प्रमोद बोरीकर, किष्णा मसराम, साईराम मडावी, कमलेश आत्राम, रवी मेश्राम, अजय सोयाम, माजी नगरसेविका ज्योती गेडाम, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हंसराज अहीर म्हणाले की, शहीद बाबुरावजींची थोरवी महान स्वातंत्र्य योध्दयाची असल्याने त्यांच्या स्मरणार्थ केंद्रसरकारच्या सहकार्यातून टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचा अल्पसा प्रयत्न करू शकलो याचा विशेष आनंद आहे. तमाम लोकांसाठी ते आदर्श आहेत. जिल्ह्याच्या सुपूत्राने ब्रिटीशांविरूध्द कांतीची ज्वाला पेटवून हौतात्म्य पत्करले हे देशातील युवकांसाठी आदर्श व सदैव प्रेरणा देणारा ठेवा आहे. अहीर पुढे म्हणाले की, आदिवासी समाज नेहमीच देशभक्तीने प्रेरीत राहील्याने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती व अन्य ज्ञात अज्ञात नरवीरांच्या शौर्याच्या, हौतात्म्याच्या गाथा सुवर्णक्षरात कोरल्या गेल्या आहेत.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आतंकवाद्यांशी लढत आहेत. त्यामुळे अशा शहीदवीरांच्या शौर्याच्या इतिहासातून प्रेरणा घेवून देशाच्या रक्षणाकरीता राष्ट्रसमर्पित युवकांची देशाला गरज पडणार आहे. प्रधानमंत्री मोदीजी शहादत्व लाभलेल्या आदिवासींची माहिती जतन करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांचे स्मारक उभे करण्याची त्यांची भूमिका असल्याचे अहीर यांनी याप्रसंगी सांगीतले. या कार्यक्रमास चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.