चंद्रपूर:- श्री माता महाकाली महोत्सवाच्या दुस-या दिवशी रात्री आठ वाजता सारेगामा फेम निरंजन बोबडे यांचा गायन व नृत्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या 151 कलावतांनी सादर केलेल्या नृत्यातून चंद्रपूरकरांना ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन घडले.
महोत्सवाच्या दुस-या दिवशी महाआरती आणि भजनाने महोत्सवला सुरवात झाली. त्यानंतर विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम पार पडलेत. तर आज तिस-या दिवशी दुपारी 10 वाजता ग्रामगीता महिलोन्नती या विषयावर बाल किर्तनकार साक्षी अवतरे यांनी कीर्तन सादर केले. तर 11 वाजता प्रतिमा स्वरुप देवता या विषयावर स्तंभ लेखिका मुर्तीशास्त्र अभ्यासिका डॉ. रमा गोळवळकर यांचा व्याख्यान कार्यक्रम पार पडला. दुपारी 12. 30 वाजता विठ्ठल दिंडी तसेच चिंगारी हु मै या पथनाट्याचे सादरीकरण एकता बंडावार व त्यांच्या समुहाने सादर केले. दुपारी 2 वाजता लोकजागृती नाट्य मंचाच्या वतीने गोंडवाना के महायोध्दा शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर नाटक प्रस्तृत करण्यात आले. यावेळी शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा शुर इतिहास दर्शविण्यात आला.
तर काल शुक्रवारी कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी सारेगामा फेम निरंजन बोबडे यांच्या समुहाने महोत्सवात भक्तीची रंगत भरली. त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी आठ वाजता त्यांच्या कार्यक्रमाला नृत्य सादरीकरणाने सुरवात झाली. त्यांच्या 151 कलावतांच्या समुहाने विविध धार्मिक नृत्य सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. यावेळी निरंजन बोबडे व त्यांच्या समुहाचे श्री महाकाली माता समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि इतर पदाधिका-यांनी महाकाली मातेची मुर्ती भेट देत स्वागत केले. निरंजन बोबडे यांच्या कार्यक्रमामुळे महोत्सवात माता महाकालीच्या भक्तीचा जागर झाला असून त्यांनी सादर केलेल्या नृत्यातून ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन चंद्रपूकरांना घडले असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मातेच्या भक्तांना पालखीचे दर्शन घेता यावे यासाठी मातेची पालखी कार्यक्रम पंडालात फिरविण्यात आली. हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सुमेधा श्रीरामे, सरोज चांदेकर, एकता पित्तुलवार, अर्चना चौधरी, मृणालिनी खाडीलकर, जगदीश नंदुरकर आदींनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.
उद्याचे कार्यक्रम..
सकाळी 9 वाजता महाआरती आणि भजनाने महोत्सवाची सुरवात होणार आहे. सकाळी 11 वाजता महिला व उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अॅड वर्षा जामदार या महिलांसाठी कायदेविषय मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता लखमापूर हनुमान मंदिरतर्फे सुंदरकांड करण्यात येणार आहे. 5 वाजता माता महाकालीची आरती होईल, सांयकाळी 6 वाजता लाखो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते युवा किर्तनकार सोपान दादा कनेरकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 8 वाजता जगप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तीमय संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहत लाभ घ्यावा असे आवाहण श्री महाकाली माता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.