ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शास्त्रज्ञांचे पथक येणार चंद्रपुरात

0
13

*सोयाबीन पिकावरील रोगाबाबत होणार ठोस संशोधन व उपाय*

*कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ २६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात*

 

चंद्रपूर, दि. २४ : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, रोगासंदर्भात कृषी तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेण्यात येईल व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि येत्या मंगळवारी, दि. २६ सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे.

 

विद्यापीठाच्या अॅग्रोनॉमिस्ट व विभाग प्रमुख डॉ. वर्षा टापरे, ब्रीडर डॉ. नीचळ, एन्टोमोलॉजीस्ट डॉ. मुंजे, प्लांट एन्टोमोलॉजीस्ट गाव्हाडे, अॅग्रोनॉमिस्ट डांगे यांचे पथक चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबत संशोधन व अभ्यास करणार आहे. चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले.

 

यासंदर्भात माहिती मिळताच पालकमंत्री ना. श्री. सुधार मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा ( खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचाही प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग दिसल्याने यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. क्षणाचाही विलंब न करता ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानुसार सोयाबीनवरील रोगांच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी खास पथक पाठविण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरील या संकटकाळात ना. श्री. मुनगंटीवार त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले असून यापूर्वीच त्यांनी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. एकुणच हवामान, नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी संकटाच्या चक्रव्युहात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो, अशी ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here