*महाकाली मातेच्या चांदीच्या मुर्ती शोभायात्रेने होणार महोत्सवाला सुरवात*
श्री महाकाली माता महोत्सव समितिच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर महोत्सवासाठी ते सकाळीच चंद्रपूरात दाखल होणार असल्याची माहिती महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
उद्या पासून सुरु होणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी 7 वाजता जैन मंदिर संस्था सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथून श्री माता महाकालीच्या चांदीच्या मुर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा जैन मदीर,गांधी चौक होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल होणार आहे. येथून गिरणार चौक मार्गे शोभायात्रा महाकाली मंदिर येथील पटांगणात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवच्या पेंडालात पोहचणार आहे. त्यांनतर पेंडालात श्री माता महाकाली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
त्यांनतर महाआरतीने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपूर दौ-यावर असून त्यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे उद्घाटन केल्या जाणार आहे. नंतर मान्यवरांच्या हस्ते नवरात्रोदरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना चांदिचे नाणे देण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 1 वाजता महिला सुरक्षा या विषयावर अतिरिक्त पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता श्रीमद् भागवत प्रवक्ता, प्रवचन किर्तनकार सरोज चांदेकर यांचे संगीतमय प्रवचन कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी 2.30 मी. वाजता शहरातील शाळेंचे विद्यार्थी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयांवर समुह नृत्य सादर करणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्री माता महाकाली जागरण गृपच्या वतीने माता महाकाली आरती व भजन गायल्या जाणार आहे. सहा वाजता नृत्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 8 वाजता जगप्रसिध्द देवी गीत जागरणकार लखबीर सिंग लक्खा यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्व माता भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहण श्री महाकाली माता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.