19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

0
15

चंद्रपूर, दि.17 : भारत देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2014 मध्ये जाहीर केला होता. या कौशल्य विकास उपक्रमाचा लाभ शहरी व ग्रामीण भागातील घटकापर्यंत पोहोचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे. त्यानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होईल.

 

जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, भद्रावती-चंदनखेडा, ब्रह्मपुरी-गांगलवाडी, चंद्रपूर-मोरवा, चिमूर-नेरी, गोंडपिपरी-भंगाराम तळोधी, जिवती-शेनंगाव, कोरपना-नांदाफाटा, मुल-राजोली, नागभीड-तळोधी बाळापूर, पोंभुर्णा-देवाडा खु., राजुरा-विरुर, सावली-मोखाळा, सिंदेवाही-नवरगाव, वरोरा-शेंगाव या 15 तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाकरीता स्थानिक आमदार, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सरपंच, ग्रामसेवक, प्राचार्य, शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील युवक व युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here