चंद्रपूर, दि.17 : कृषि विभाग व सुमिटोमो केमिकल्स इंडीया लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, संरक्षित कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान व कीटकनाशक फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधेसंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा घेतला.
बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडाळे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, कीटकनाशक फवारणी करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास विषबाधा टाळता येऊ शकते. जिल्ह्यात मागील चार वर्षात कीटकनाशक फवारणी विषबाधेमुळे एकही मृत्यू झालेला नाही. एखाद्या शेतकऱ्यास ज्यावेळी कीटकनाशकाची विक्री होत असते, अशा शेतकऱ्यांची माहिती ठेवावी. त्यासोबतच जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी व कीटकनाशके हाताळतांना घ्यावयाची काळजी यांच्या जनजागृतीसह शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणीसंदर्भात योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असून कृषी विभागाने फवारणीसंदर्भात योग्य प्रशिक्षण द्यावे. तसेच ज्या तालुक्याच्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी विषबाधितांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत दिले.
आत्मा नियामक मंडळाचा आढावा:
आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, परंपरागत कृषि विकास योजने(सेंद्रीय शेती)अंतर्गत नागभीड व सिंदेवाही येथे क्लस्टर निर्मिती करण्यात यावी. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत राज्य पुरस्कृत योजना सन 2023-24 ते 2027-28 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअतंर्गत सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासोबतच, जिल्ह्यातील स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणी दुर कराव्यात. जागतिक बँक सहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत कृषि, पशुसंवर्धन, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांना दिलेल्या लक्षांकाप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना योजनेत सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बैठकीत दिल्या.