मुंबई, दि. ६:- गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील आगीत जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे भेट घेऊन विचारपूस केली. तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. त्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ही मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
नवी दिल्लीतून दौरा आटोपून मुंबईत पोहचताच मुख्यमंत्री श्री. शिंदे विमानतळावरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे पोहचले. तेथून त्यांनी गोरेगाव येथील घटनास्थळीही भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांशी संवाद साधत, त्यांना दिलासा दिला.
‘एसआरएच्या अशा इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून अशा घटना घडू नयेत याची काळजी घेता येईल. यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त केला जाईल. इमारतींचे सर्वेक्षण केले जाईल. अधिकारी इमारतींचे ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करतील, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
यावेळी खासदार गजानन किर्तीकर, मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल तसेच वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
तत्पुर्वी, सकाळीच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवी दिल्ली येथून या घटनेची माहिती घेऊन, दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति सहवेदना प्रकट केली होती. तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा,असेही निर्देश दिले होते.
0000