नवरात्री दरम्यान श्री. माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ऑक्टोंबर पासून सुरु होणार असलेल्या या महाकाली महोत्सवाकरीता श्री. महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली असुन महोत्सवादरम्यान माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
यावेळी श्री. महाकाली माता महोत्सव समीतीचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष अजय जयस्वाल, बलराम डोडाणी कोषाध्यक्ष पवन सराफ, सदस्य मधुसुदन रुंगठा, अशोक मत्ते, मिलींद गंपावार, राजू शास्त्रकार, कुक्कु सहाणी, मोहित मोदी यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली ची महती राज्यभरात पोहचावी, येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षीपासून चंद्रपूरात श्री. माता महाकाली महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी या महोत्सवाला नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता. यंदाही 19 ऑक्टोंबर पासून महाकाली मंदिर च्या पटांगणात श्री. माता महकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सदर आयोजन पाच दिवस चालणार असून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत भरणार आहे. तर 23 ऑक्टोंबरला श्री माता महाकालीची भव्य नगर पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
दरम्यान काल गुरुवारी श्री. महाकाली माता महोत्सव समीतीच्या पदाधिका-यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांना श्री. माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या महोत्सवात उपस्थिती दर्शविणार असल्याचे म्हटले आहे. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार आणि समितीच्या सर्व पदाधिका-यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुनरी व माता महाकालीची मुर्ती भेट स्वरुप दिली आहे.