चंद्रपूर,दि. 03 : महिलांची सुरक्षा, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी ‘मिशन शक्ती’ या एकछत्री योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण केंद्र ही घटक योजना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय आणि महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितरीत्या राबविण्यात येत आहे.
या योजनेची जिल्हास्तरावर संपूर्ण अंमलबजावणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकारी कार्यालय,चंद्रपूर यांच्याअंतर्गत करण्यात येते. महिला सक्षमीकरण केंद्र जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटर, स्त्री आधार केंद्र, कृष्ण नगर चौक, मुल रोड, चंद्रपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील प्रवेशित गरजू लाभार्थींना/महिलांना आरोग्य सेवा, उच्चप्रतीचे शिक्षण, व्यावसायिक कारकीर्द, व्यावसायिक समुपदेशन, वित्तीय नियोजन, उद्योजकता बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस, कामगार वर्गाचे आरोग्य व सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता आणि डिजिटल साक्षरता आदी क्षेत्रात योजनाबद्ध पद्धतीने सक्षम तसेच विकास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच शासकीय कार्यक्रमात नाव नोंदणी करणे तसेच महिलांना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षण, आधार, मनरेगा नावनोंदणी आदी कागदपत्रे तयार करण्यास मदत करण्यात येते.
केंद्रामध्ये येणाऱ्या प्रवेशित लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी सद्यस्थितीत वन स्टॉप सेंटर येथील केंद्र प्रशासक यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू आहे. सर्व सामाजिक कार्यकर्ते, शासकीय व अशासकीय संस्था यांनी शासनाच्या या योजनेची माहिती चंद्रपूर शहर, तालुका व गावपातळीवर सर्व गरजू महिलापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. सर्व गरजू महिलांनी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक (प्रभारी) यांच्याशी 7498932673 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सखी वन स्टॉप सेंटर, स्त्री-आधार केंद्र, कृष्ण नगर चौक, मुल रोड, चंद्रपूर या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या भेट देऊन जास्तीत जास्त महिलांनी महिला सक्षमीकरण केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले आहे.