घरपट्टे मिळण्यापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – ना. सुधीर मुनगंटीवार मूल येथे 116 लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप.

0
19

चंद्रपूर, दि. 22 : अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य असलेल्या कुटुंबाना घरपट्टे देऊन नियमानुकूल करणे, हे शासनाचे धोरण आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत घरपट्टे वाटपाचा श्रीगणेशा आज (दि.21) मूल येथून करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या असून  कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

मूल तहसील कार्यालय व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पात्र नागरिकांना घरांचे पट्टे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले,मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, न.प. मुख्याधिकारी यशवंत पवार, माजी न.प.अध्यक्ष रत्नमाला भोयर, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर,नंदू रणदिवे,चंद्रकांत आष्टनकर, महेंद्र करताडे, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे,ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.

पट्टे हे महसूलच्या जमिनीवरच देता येतात. वन, रेल्वे, संरक्षण विभागाच्या जमिनीवरील पट्टे देता येत नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जमिनीचा पट्टा नावावर असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आवास योजनेचा आढावा घेतला असता, अनेकांकडे घरपट्टेच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यात मिशन मोडवर योग्य व पात्र व्यक्तिंना घरपट्टे वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात रमाई आवास योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी व घरकुलांची संख्या जास्त आहे. शबरी आवास योजनेअंतर्गत निकषाच्या तरतुदीनुसार पूर्तता करीत असेल त्यांना घरकुल देण्यात येईल. आतापर्यंत ओबीसी प्रवर्गाकरीता घरकुल कमी होते. आता मात्र नमो आवास योजनेंतर्गत राज्यात 3 वर्षात 10 हजार घरे बांधण्यात येणार आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मूल येथे विकासाची गंगा : मूल येथे भव्यदिव्य नाट्यगृह बांधण्यात आले असून या भागात रस्ते, स्टेडीयम, जीम, उद्यान, वीज पुरवठा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, विद्यार्थ्यांसाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी अभ्यासिका आदी विकासकामे करण्यात आली आहे. या भागात विकासाची जवळपास 200 कामे पूर्ण करण्यात आली आहे. अपूर्ण असलेली कामेसुध्दा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मूल येथे 100 बेडेड ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त करण्यात येईल.

अधिकारी व पदाधिका-यांनी योजना जनतेपर्यंत पोहचवाव्या : राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. यासाठी शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच पदाधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे. शासन जनेतसाठी काम करीत असतांना अधिका-यांनी विनाकारण अडवणूक करू नये, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

या कुटुंबाला मिळाले घरांचे पट्टे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गजानन  शेडमाके व अंजली शेडमाके, बेबी कोकोडे, शांता जेंगठे, रविंद्र जेंगठे व रेखा जेंगठे, आनंद मोहुर्ले व श्वेता मोहुर्ले, शंभु मडावी व मालन मडावी, शामराव वडलकोंडावार व ताराबाई वडलकोंडावार, हरीदास मेश्राम व गिता मेश्राम यांना घरपट्टे प्रमाणपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here