*कृषी विभागाच्या चमूसोबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची शेतकऱ्यांच्या बांधावर सोयाबीनची पाहणी*
चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे तीनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक हंगामात हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एक लाख प्रती हेक्टरी मदत जाहीर करण्याची लोकहितकारी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या चमूसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे आहे. या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप पीक हातून गेले आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन पॅकेज जाहीर करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
आज जिल्हा स्तरीय समिती मधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही चे डॉ.विनोद नागदेवते, कृषी अधिकारी विनोद कोसनकर,ओरियंटल इन्शुरन्स कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी कारपेनवार व चौधरी यांनी वरोरा तालुक्यातील विविध महसूल मंडलमधील चारगाव ( बु ) , चारगाव (खुर्द) व वरोरा मंडळ अंतर्गत शेंबळ, या गावातील सोयाबीन नुकसान ग्रस्त क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यामध्ये आमदार धानोरकर यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी व संपुर्ण कृषी विभाग आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सोयाबीन पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पिकावर कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावल्या गेले आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. संपूर्ण शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला नसून पिक विमा व्यतिरिक्त शासनाने या आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी नैसर्गिक आपत्ती नुकसान या बाबी अंतर्गत प्रती हेक्टरी एक लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी,अशी मागणी केली आहे.
संपूर्ण वरोरा तालुक्यासह ईतर तालुक्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रधानमन्त्री पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यात मिड सिजन अडवर्सिटी (Mid season adversity) तात्काळ लागू करून तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अश्या सूचना केल्या. या दौऱ्यात मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु. विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी घनश्याम पाटील, कृषी अधिकारी मारोती वरभे, उमाकांत झाडे, पंकज ठेंगणे,राजु चिकटे, योगेश वायदुळे, योगेश खामनकर, ईश्वर सोनेकर, संदीप थुल, बंडू शेळकी व परिसरातील ५० शेतकरी उपस्थित होते.