विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा विकास करण्याचे मोठे काम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केल्या जात आहे. येणारा काळ औद्योगिकरणाचा आहे. येथे नौकरी मिळविण्याची मोठी संधी आजच्या युवकांना आहे. तसेच आपल्या कौशल्यातून स्वताचा रोजगार आपण उभा करु शकतात. त्यामुळे येथुन मिळविलेले कौशल्य स्वतापुर्ते मर्यादित न ठेवता यातून आयुष्यात परिर्वतन घडवा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर च्या वतीने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हुतात्मा स्मारक येथे पी.एम स्कील रन अंतर्गत मिनी मॅराथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर मिनी मॅराथाॅन दौडला सुरवात झाली. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, आय टी आय चे प्राचार्य रवी मेहेंदळे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक इंदू कांत मिश्रा, आय.टी.आयचे अविनाश गभने, घटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारत कृषिप्रधान देश असला तरी औद्योगिक क्षेत्रातही भरारी घेत आहे. उद्योगाला लागणारे कुशल कारागीर घडविण्याचे महत्वाचे काम या संस्था करीत आहे. औद्योगिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यास, त्यांना नौकरी शोधण्यासह स्वतःचा रोजगार उभा करण्यातही मदत होऊ शकते. औद्योगिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचा विकास करण्यात मदत होते. त्यातून त्यांच्यात आपल्या आत्मसमर्पणाने काम करण्याची क्षमता विकसित होत असते. आज औद्योगिक शिक्षण महत्वाचे ठरले आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील व्यवसायिक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त होत. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कंपन्यांच्या कामाच्या तंत्रज्ञानाच्या विभागातील विचारांची माहिती, कौशल्ये, आणि अनुभवाचे शिक्षण प्राप्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता या क्षेत्राकडे आवडीने वळले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.
आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. यात महिलांसाठी आपण शिवणकाम, फॅशन डीजायनिंग, ब्युटी पार्लर, मेकअप, मोबाईल रिपेअरिंग यासारखे प्रशिक्षण देत आहोत. या अंतर्गत आपण जवळपास अडिच हजार महिलांना प्रशिक्षीत केले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कौशल्य मिळविण्यासाठी धावपड करावी लागते हे सत्य आहे. मात्र एकदा कौशल्य प्राप्त केले की ते आजिवन आपल्याकडे राहते. यातून आर्थिक प्रगती साधता येत असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी आयोजित मिनी मॅराथॉन दौडला आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर स्पर्धकांनी स्पर्धेला सुरवात केली. यात सहभागी सर्व स्पर्धकांना आ. जोरगेवार यांनी शुभेच्छा दिल्या.