चंद्रपूर १७ डिसेंबर – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “सिकलसेल नियंत्रण सप्ताह’’ मनपा आरोग्य विभागामार्फत ११ ते १७ डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात आला.सिकलसेल हा आजार अनुवंशिक असून या आजारावर अद्याप कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या रोगी व वाहक व्यक्तीवर औषधोपचार करण्यात येत असले तरी या रोगाचा प्रादुर्भाव पुढच्या पिढीमध्ये टाळता यावा यासाठी लोकांमध्ये या विषयी जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याने ११ ते १७ डिसेंबर हा कालावधी ‘’सिकलसेल नियंत्रण सप्ताह’’ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
सिकलसेल हा आजार रक्तदोष असून सिकल पेशी रक्तक्षय या नावाने ओळखला जातो. या आजारात लाल रक्त पेशींचा आकार विळ्यांसारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. सिकलसेल पेशी आजारामुळे नेहमीची होणारी गुंतागुंत म्हणजे रक्तक्षय (अनिमिया) या आजारावर वेळीच लग्नापूर्वी तपासणी केली तर पुढच्या पिढीला अनुवंशीकतेने होणाऱ्या या आजारापासून आपण वाचवू शकतो, म्हणून लग्न करण्यापूर्वी मुलगा-मुलगी दोघांनीही रक्ताची तपासणी करूनघेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.
लक्षणे :
या आजाराची लक्षणे ही अशक्तपणा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, सांधे दुखी, सांधे सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतु संसर्ग होणे, चेहरा निस्तेज दिसणे ही आहेत.
तपासणी :
या आजाराचे निदान शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत केले जाते. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत सिकलसेलची तपासणी मोफत केली जाते. सिकलसेल वाहक व ग्रस्त रुग्णास मोफत समुपदेशन, औषधोपचार व संदर्भ सेवा उपलब्ध आहेत.
शासकीय योजना :
या आजारावर उपचारासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १ हजार रुपये प्रति महिना दिला जातो.
१० वी – १२ वी च्या सिकलग्रस्त विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत प्रति तास २० मिनिटे ज्यास्ती मिळतात.
मोफत एस.टी.प्रवास ( १५० कि.मी.)
मोफत औषधोपचार
एस.बी.टी.सी कार्ड मार्फत मोफत रक्त उपलब्ध