चंद्रपूर, दि. 22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे होणार आहे. मतमोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर शहरातील न्यायालयापासून ते डॉ. हेडगेवार आश्रय छात्रवासापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही बाजूचे रस्ते नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मतमोजणी दरम्यान दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 4 वाजतापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चंद्रपूर शहरातील न्यायालयाच्या मेन गेट पासून ते डॉ. हेडगेवार यांचे आश्रय छात्रावासपर्यंत सर्व वाहनांना सदर रस्ता वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. तसेच सदरचे दोन्ही रस्ते हे नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आल्यामुळे या मार्गावर कोणत्याही नागरिकांनी आपले वाहन पार्किंग करू नये व हातठेले सुद्धा लावू नये.
मतमोजणीकरिता येणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनाकरिता खालीलप्रमाणे पार्किंग स्थळे घोषित करण्यात आली आहे.
1. प्रशासकीय भवन पार्किंग (दुचाकी वाहनांकरिता)
2. रेल्वे स्टेशन (चारचाकी वाहनांकरिता)
वरील आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.