चंद्रपूर, दि. 11 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रावर असलेल्या किमान मुलभूत सुविधांची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पाहणी केली. सोमवारी त्यांनी चंद्रपूर शहरातील सात मतदान केंद्रांना भेटी देऊन संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, मतदान केंद्रावर पार्किंगची व्यवस्था असावी. तसेच 200 मीटरच्या बाहेर बुथ लावण्यात यावे. दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 3-4 स्वयंसेवक असणे आवश्यक आहे. तसेच जेथे मतदानासाठी नागरिकांच्या रांगा असतील तेथे थोड्या थोड्या अंतरावर बसण्याकरीता बेंचेसची व्यवस्था करावी. सोबतच प्रतिक्षालयाचे पण नियोजन करावे. जेणेकरून मतदारांना लगातार उभे न राहता थोडी विश्रांती घेणे सोयीचे होईल. मतदान केंद्राच्या आत पंखे, पुरेसे लाईट असावेत, याशिवाय परिसरातसुद्धा लाईटची व्यवस्था करावी. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असावे. ते सुस्थितीत आणि स्वच्छ असले पाहिजे. एकाच इमारतीमध्ये अनेक मतदान केंद्र असल्यास क्रमांकानुसार मतदान केंद्राची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, महानगर पालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, नायब तहसीलदार श्री. गादेवार यांच्यासह इतर अधिकारी – कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आदी उपस्थित होते.
या मतदान केंद्रांची केली पाहणी : यावेळी जिल्हाधिका-यांनी चंद्रपूर शहरातील सात मतदान केंद्रांना भेटी देऊन आवश्यक सोयीसुविधांची पाहणी केली. यात ज्युबली हायस्कूल, घुटकाळा येथील नेहरू विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, घुटकाळा वॉर्ड येथील सिध्दार्थ हायस्कूल, नगीनाबाग येथील हिस्लॉप कॉलेज, वासेकर वाडी येथील जनता हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्टस्, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, सिव्हील लाईन येथील जनता कॉलेजचा समावेश होता.