मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर विविध पथकांद्वारे नियंत्रण.! जिल्हाधिका-यांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना सुचना..!

0
12

 

चंद्रपूर, दि. 7 : मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना पथकाबाबत पुर्तता करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

विधानसभा मतदारसंघाकरीता मतदारसंघ नियंत्रण कक्ष : प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करणे. नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून एका अनुभवी वरिष्ठ अधिका-याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करणे तसेच त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, मेल आयडी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सादर करणे. सदर अधिका-याला जिल्हा नियंत्रण कक्षातील समन्वय अधिका-यांच्या संपर्कात राहण्याबाबत निर्देशित करणे. नियंत्रण कक्षाअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरीता विविध पथकांची नेमणूक करणे.

 

संपर्क व्यवस्था पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करावी. पथक प्रमुखांनी क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना संपर्क साधून आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे मतदानाची आकडेवारी व इतर अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी नेमणूक करावी. या पथकास आवश्यक ते नमुने उपलब्ध करून द्यावे व कामकाजाबाबत आवश्यक प्रशिक्षण घ्यावे.

 

मुलभूत सोयी-सुविधा/ साहित्य समन्वय पथक : सदर पथक प्रमुखाने मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मुलभूत सोयीसुविधा, मतदानाशी संबंधित साहित्य/ ईव्हीएमची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री करावी व ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्या तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात. जेणेकरून मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडणार नाही. पथक प्रमुखांना या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल मतदानाच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांना सादर करावा.

 

वेबकास्टींग मॉनेटरिंग पथक : पथक प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी वेबकास्टींग असणा-या प्रत्येक 40-50 मतदान केंद्राच्या मॉनेटरिंग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. मतदान केंद्रावर घडणा-या आक्षेपार्ह बाबी निदर्शनास येताच सदर बाब मतदान केंद्राचे नाव, नंबरसह संबंधित पथक प्रमुखांच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अवगत करावी.

 

जीपीएस मॉनेटरींग पथक : 8 ते 10 क्षेत्रीय अधिका-यांच्या मॉनेटरींग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. सर्व क्षेत्रीय अधिकारी फिरते राहतील तसेच कोणताही क्षेत्रीय अधिकारी मतदान केंद्र व्यतिरिक्त दुस-या ठिकाणी थांबणार नाही, याबाबत मॉनेटरींग करावे. कायदा सुव्यवस्था / मतदान केंद्रावरील तक्रारी / ईव्हीएमबाबत तक्रारी, संपर्क व्यवस्था पथकामधील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिका-यांना कळविण्याची कार्यवाही करावी.

 

मिडीया मॉनेटरींग पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करणे व त्यास सहाय्य करण्यासाठी पुरेशा कर्मचा-यांची नियुक्ती करणे. मतदानाच्या दिवशी संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये प्रसारीत होणा-या बातम्या तात्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निदर्शनास आणून देणे. मतदानासंबंधित बातम्यांचे निरीक्षण करण्याकरीता स्थानिक केबल नेटवर्कसह राज्य/राष्ट्रीय पातळीवरील बातम्या प्रसारीत होणारे चॅनल्स व टीव्हीसंच उपलब्ध करून द्यावेत.

 

जलद प्रतिसाद पथक : पथक प्रमख म्हणून तहसीलदार यांची नेमणूक करावी. मतदान केंद्राचे भौगोलिक दृष्ट्या स्थान व मतदान केंद्रावर तात्काळ पोहचणारे दळणवळणाचे मार्ग गृहीत धरून आवश्यक तेवढ्या जलद प्रतिसाद पथकाची नेमणूक करणे. सदर पथकामध्ये मतदान प्रक्रियेबाबत जाणकार व ईव्हीएम- व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली अवगत असणा-या कर्मचा-याची नेमणूक करावी. आवश्यकतेच्या वेळी सदर पथक आवश्यक त्या ठिकाणी / मतदान केंद्रावर पोहचून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विषयाची हाताळणी करण्याबाबत नियेाजन करावे.

 

मतदानाच्या दिवशी नियंत्रण व नियोजनाबाबत सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here