चंद्रपूर:- आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला ऐतिहासिक यश आले असून मतदारसंघातील 16 बुद्धविहार येथे 16 अभ्यासिकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एका वेळी 16 अभ्यासिकांसाठी निधी मंजूर करणारे चंद्रपूर हे राज्यातील पहिले मतदारसंघ ठरले आहे.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा नारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. मात्र आजची महागडी शिक्षण व्यवस्था लक्षात घेता सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे मतदारसंघात शासकीय अभ्यासिकांचे जाळे तयार करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. यासाठी त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. यात त्यांना यशही आले असून आजघडीला शहरात जवळपास 9 अभ्यासिकांचे काम प्रगतीपथावर आहे, तर सहा अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बुद्धविहारांमध्ये अभ्यासिका तयार करण्याची मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर “जिथे बुद्धविहार, तिथे अभ्यासिका” असा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून मतदारसंघातील 16 अभ्यासिकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
चंद्रपूरात अभ्यासिकांचे जाळे तयार करण्याचा संकल्प आपला होता आणि यात मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्ध विहारांमध्ये आज अभ्यासिकांसाठी मोठा निधी देता आल्याचे समाधान आहे. हे काम येथेच थांबणार नसून पुढेही आणखी बुद्धविहारांना आपण निधी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.