बल्लारपूर, दि.07 – बल्लारपूर विधानसभेसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. त्यांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात आता बल्लारपूर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित करण्यात येणार आहे. या स्टेडियमचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. उद्या याच स्टेडियममधून बल्लारपूर विधानसभेतील खेळाडू आंतरराष्ट्रीय भरारी घेतील, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर येथील गोरक्षण वार्ड मध्ये 1 कोटी 78 लक्ष रुपये खर्च करून स्टेडियमचा विकास व सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, राजबहादुर सिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बल्लारपूर येथील युवकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गोरक्षण वॉर्ड येथे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्टेडियमचा विकास आणि सौंदर्यीकरण केले जात आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. बल्लारपूर येथील गोरक्षण वॉर्डातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विकास व सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यामध्ये कंपाऊंड वॉल, एन्ट्री गेट, बाह्य गेट, स्वच्छतागृहे, 550 मीटरचा जॉगिंग ट्रॅक, पाण्याची व्यवस्था तसेच ओपन जिम असणार आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी केली. तसेच सदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स युवकांच्या सोयीसुविधा विचारात घेऊन विकसित करण्यासाठी सबंधितांना सूचना केल्या.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून तरुणांच्या सुदृढ आरोग्याला चालना मिळेल. जिल्ह्यातील युवकांवर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य करण्यात येत आहे. बल्लारपूर स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिली अंडर-19 स्पर्धा बल्लारपूर तालुक्यातील स्टेडियममध्ये पार पडली, ही गौरवाची बाब आहे. याठिकाणी खेळून गेलेले खेळाडू व्यवस्थेचे कौतूक करतात ही अभिमानाची बाब आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
जिल्ह्यातील खेळाडूसांठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नेमबाजीसाठी संगणकीय सुविधा असलेले आर्चरीचे स्टेडियम उभे राहत आहे. नेमबाजीत 2036 च्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूर-गडचिरोली येथील खेळाडू सुवर्ण पदक प्राप्त करेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
बालेवाडीनंतर सर्वात मोठे इनडोअर स्टेडियम म्हाडाच्या 16 एकर जागेवर पूर्णत्वास येत असून बल्लारपूर शहरातील परंपरागत वारसा असलेले पाच आखाडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येत असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी बल्लारपुरातील युवक व खेळाडू उपस्थित होते.