चंद्रपूर, दि. 3 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन 2024-25 या वर्षात समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानाच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा.
समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत : 1. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना 25 लक्ष रुपये. उपरोकत योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत.
असमान निधी योजना : 1. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी 4 लक्ष रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लक्ष रुपये लाख) 2. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. (2.50 लक्ष रुपये) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (2 लक्ष रुपये). 3. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य (6.20 लक्ष व इमारत विस्तार 10 लक्ष रुपये). 4. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (1.50 लक्ष, 2.50 लक्ष आणि 3 लक्ष रुपये). बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरास्थापन’ करण्याकरिता अर्थसहाय्य (6.80 लक्ष रुपये)
असा करा अर्ज : वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानाचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.