मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना च्या दहापैकी दहा उमेदवार निवडून आले. विद्यापीठापासून दिल्लीपर्यंत मूळ शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंचाच आवाज बुलंद आहे यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेत कितीही फूट पाडली, कितीही आमदार आणि नगरसेवक फोडले तरी सामान्य माणूस हा कालही ठाकरेंबरोबर होता, आजही ठाकरेंबरोबर आहे आणि उद्याही ठाकरेंबरोबरच असेल हेच, या निकालाने स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकात काय निकाल लागणार आहेत, त्याचा हा ट्रेलर असल्याचे युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी भाजपा हा निवडणुकांना घाबरणारा पक्ष आहे. सगळ्या निवडणुका टाळून, लांबणीवर टाकून स्वतः कारभार हाकायचा ही भाजपाची रणनीती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपून दोन वर्षे उलटून गेली तरी निवडणुका घेण्याचे धाडस भाजपाला झालेले नाही. थापेबाजी, भ्रष्टाचार, गद्दारी यामुळे जनतेच्या मनात तीव्र रोष निर्माण झाला आहे. तो उफाळून येण्याची भीती भाजप नेतृत्वाला सातत्याने वाटते आहे. म्हणूनच सगळ्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत हे सामान्य जनता समजून चुकली आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुद्धा भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून पुढे ढकलले आहेत. निवडणुका कितीही लांब गेल्या तरी त्याचा मोठा फटका भाजप आणि गद्दार गटालाच बसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लांबीवर टाकण्याचे जसे राजकारण भाजपने खेळले तसेच ते सिनेट निवडणुकांमध्येही खेळण्यात आले. निवडणुकीच्या तारखेच्या आदल्या दिवशी निवडणूक लांबीवर टाकण्यात आली. मतदारांची फोडाफोडी करण्याचा भाजपचा डाव होता मात्र तो सिनेटच्या मतदारांनी उधळून लावला. गद्दार गटाला एकही जागा न देऊन भाजपने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीतही भाजप भीक म्हणून जेवढ्या जागा देईल, तेवढ्याच जागा गद्दार गटाला लढवाव्या लागतील आणि त्यातही पराभवाची नामुष्की पत्करावी लागेल हेच त्रिवार सत्य आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला दणकून मार दिला. गद्दार गटाने पाण्यासारखा पैसा खर्च करून काही जागा निवडून आणल्या. सत्तेचा बेफाम वापर, पैशाचा पाऊस यामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागा महायुतीने जिंकल्या. पण पैसे सर्वच निवडणुकात कामाला येत नाहीत हेच सिनेट निवडणुकांनी दाखवून दिले आहे. मुंबईच्या सामान्य माणूस 1966 सालापासून ठाकरे या आडनावाचा झंझावाताच्या मागे ठामपणे उभा आहे. अनेक बडे बडे नेते ठाकरेंना सोडून गेले मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला अस्सल शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. असंख्य संकटे उभी राहिली तरी त्यावर ठाकरेंनी मात केली. शेकडो गद्दारांना महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले. आव्हानावर मात करून ठाकरेंनी शिवसेनेचा भगवा नेहमीच फडकत ठेवला आहे. भविष्यातही तो फडकत राहील. सिनेट निवडणुकांचे निकाल ही भविष्यातील राजकारणाची नांदी असून चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भात ही असेच यश शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडी ला मिळेल असे युवासेना विदर्भ सचिव, तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी पुढे म्हटले आहे.