चंद्रपूर: दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची दुसरी पिढी ही परंपरा उत्साहाने पुढे नेत आहे.
जोरगेवार कुटुंबीयांनी गणेशोत्सवाची महती मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांच्या या उत्सवाला ९४ वर्षांची परंपरा असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहेत.
गणेशोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी, जोरगेवार कुटुंबीयांनी गणरायाची आरती केली आणि गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंबाचे आणि समाजाचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. जोरगेवार कुटुंबीयांची गणेशोत्सवाची ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि समाजाभिमुखतेचा अनोखा संगम आहे. गणपतीच्या या आगमनाने त्यांच्या निवासस्थानी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांसह नागरिकांनी सहर्ष गणरायाचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवाच्या या पारंपरिक सोहळ्याचे ९४ वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल जोरगेवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आगामी वर्ष नागरिकांसाठी सुख, समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायापुढे केली आहे.