चंद्रपूर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल आज तुकूम येथील सिद्धार्थ बुद्ध विहार, राजगीरी बुद्ध विहार आणि लिंबूनि बुद्ध विहार च्या वतीने एकत्रित कार्यक्रम आयोजित करून आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सिद्धार्थ बुद्ध विहारचे अध्यक्ष अरविंद कातकर, सचिव मारोतराव रायपुरे, लिंबूनि बुद्ध विहारचे अध्यक्ष देठे, राजगिरी बुद्ध विहारचे अध्यक्ष भाऊराव सागोरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप वावरे, राजेश वनकर, यंग चांदा ब्रिगेडचे राशिद हुसेन, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, करण नायर, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभूमीचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. पहिल्याच अधिवेशनात सदर विकासकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एकत्रित १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानंतर सदर मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली. यात त्यांना यश आले असून नुकतेच सदर कामासाठी पहिल्या टप्यात ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वयही ६५ वर्ष होते. एवढ्याच फूट उंचीचे त्यांचे स्मारक येथे तयार केले जाणार आहे. नागपूरच्या धर्तीवर येथील दीक्षाभूमीचा विकास होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
याच कार्याबद्दल आज शनिवारी तुकूम येथील सिद्धार्थ बुद्ध विहार, राजगीरी बुद्ध विहार आणि लिम्बूनी बुद्ध विहारच्या वतीने सिद्धार्थ बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करत आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, निवडून आल्यानंतर काही कामांना मी प्राथमिकता देत ते काम पूर्ण करण्याचा संकल्पच केला होता. यात बाबूपेठ उड्डाणपूल आणि पवित्र दिक्षाभूमीचा विकास या कामांचाही प्रामुख्याने समावेश होता. हे दोन्ही काम मला पूर्ण करता आले याचा आनंद आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या दीक्षाभूमी विकास होत नव्हता. या विकासकामात अनेक अडचणी होत्या. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावलांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या दिक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले आणि ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, असे ते यावेळी म्हणाले.
आपण मतदारसंघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यातील एक कोटी रुपयांची अभ्यासिका दिक्षाभूमी येथे तयार केली आहे. येथे विद्यार्थी अभ्यास करत असून १ लाख पुस्तके या अभ्यासिकेत राहणार आहेत.अनेक विकासकामे आपण पाच वर्षांत पूर्ण करू शकलो आहोत. ३० ते ४० वर्ष जुन्या मागण्या पाच वर्षांत पूर्ण करू शकलो याचे समाधान असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.