अवयव दात्यांचे समाजासाठी असाधारण योगदान – आ. किशोर जोरगेवार…! अवयव दान करण्याचा संकल्प करणाऱ्या दानदात्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार.  

0
9

 

अवयव दान हे केवळ एका व्यक्तीच्या जीवनाचा उद्धार करण्याचे कार्य नाही, तर ते संपूर्ण समाजाला एक सकारात्मक संदेश देणारे कार्य आहे. आपल्या अवयवांचे दान करणे म्हणजे दुसऱ्यांना जीवनदान देणे, आपल्या देणगीमुळे एखाद्याच्या आयुष्यात नवसंजीवनी मिळते, त्याच्या कुटुंबाला आशा मिळते, आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना एक नवीन दिवस पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे अवयव दात्यांचे समाजासाठी असाधारण योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राजमाता निवासस्थानी अवयव दान करण्याचा संकल्प केलेल्या दानदात्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. सपन कुमार दास, अॅड. जर्नाधन बदकी, रिना सरकार, डॉ. बालमुकुंदन पालिवाल, शशिकांत मस्के, मलिंद्र बलीक, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज शहर प्रमुख सविता दंडारे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, ज्या व्यक्तींनी आपले अवयव दान केले आहेत, ते शूरवीर आहेत. एका अनामिकासाठी, आणि एका भविष्यासाठी जीवनदान देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या त्यागाने आणि समर्पणाने अनेक लोकांचे आयुष्य उजळून निघाले आहे. त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन, आज आपण त्यांचा सन्मान करतो आहोत.

अवयव दानाचा विचार हा प्रत्येकासाठी सोपा नाही. यासाठी मनाची तयारी, कुटुंबीयांची सहमती, आणि समाजाच्या भल्याची भावना असावी लागते. दानदात्यांनी आपल्या अवयवांचे दान करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत धैर्यशील आहे. मृत्यूनंतर आपल्या अवयवांचा उपयोग कोणाच्या तरी जीवनात नवा प्रकाश आणण्यासाठी होऊ शकतो. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अवयव दान करणाऱ्या दानदात्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला दानदात्यांसह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here