चंद्रपूर, दि.१५ – यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आल्यामुळे शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे काही गावांना आसोलामेंढा तलावातील पाणी कॅनॉलद्वारे तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
मूल व पोंभूर्णा तालुक्यात गावांमधील शेतीला आसोलामेंढा प्रकल्पाच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. या ठिकाणी भाताची शेती मोठ्या प्रमाणात होते. दुर्दैवाने, खरीप हंगाम २०२४ मध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे राजगड, भवराळा पासून घाटकुळ आणि दिघोरी पर्यंत गावांमध्ये शेतीला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळाले नाही. अश्यात शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
आसोलामेंढा तलावातील पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याची कार्यवाही तातडीने करावी, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी व आसोलामेंढा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना यामध्ये स्वतः लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचेही निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.