चंद्रपूर,दि. 5 : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बांधकाम, अंतर्गत डागडूजी व इतर कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 5) जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, तहसीलदार विजय पवार, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, श्री. येरगुडे, डॉ. जिवने, मार्ड संघटनेचे डॉ. अक्षय वाघमारे आदी उपस्थित होते.
इमारतीमध्ये काही ठिकाणी पाणी गळती होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने गळतीची कारणे शोधून त्वरीत दुरुस्त करावे. अतिदक्षता विभाग अतिशय सुसज्ज करून लवकरात लवकर वातानुकूलीत यंत्रणा कार्यान्वित करावी. अंतर्गत दुरुस्ती व डागडूजीची काही कामे अजूनही शिल्लक आहेत. ती त्वरीत पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना बांधकाम विभागाने सक्त निर्देश द्यावे. इतर कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे अंदाजपत्रक त्वरीत सादर करावे. रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण परिसराची स्वच्छता ठेवावी. पाण्याच्या टाक्या, अंतर्गत नालेसफाई नियमित करावी. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या निवासी वसतीगृहात अंतर्गत सुविधा चांगल्या असणे आवश्यक आहे, याबाबत विशेष लक्ष द्यावे. सीटी स्कॅन मशीन बंद राहता कामा नये. दुरुस्तीबाबत संबंधित एजन्सीला निर्देश द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी त्यांनी अपघात विभाग, डे-केअर सेंटर, अतिदक्षता विभाग, प्रसुती विभाग, स्त्रीरोग, बालरोग विभाग तसेच नवजात शिशु अतिदक्षता कक्षाची पाहणी केली.