चंद्रपूर:- मागील काही दिवसांपासून ताडाळी परिसरात वाघाचा मुक्त संचार असून येथील पाळीव जनावरांना वाघाने ठार केले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे सदर वाघाला तत्काळ जेरबंद करा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर वनवृत्त क्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहेत.
ताडाळी येथील नागरिकांना मागील काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. त्यातच काल वाघाने ताडाळी आणि चारगाव शिवारात म्हैसवर हल्ला करून ठार केले. तर आज ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी गावात वासरू व बकरीवर हल्ला करून ठार केल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.
सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतीविषयक काम करण्याकरिता शेतात जातात. त्यामुळे सदर परिसरात मानव आणि वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता कोणतीही मानवी जीवितहानी होण्याआधी सदर वाघाला जेरबंद करण्याकरिता वन विभागाची चमू पाठवून वाघाला जेरबंद करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. सदर मागणीचे पत्रही त्यांच्या वतीने मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना पाठविण्यात आले आहे.