मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वित्झरलॅंड च्या दावोस मध्ये तीन लाख कोटी पेक्षा अधिकचे एमओयू साइन केले आहेत. यातील अनेक उद्योग राज्यात येत आहेत. चंद्रपूर लगतच्या सुरजागड येथेही लोहखनिज प्रकल्प आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी चंद्रपूरात लोहखनिजावर आधारित उद्योग सुरू करण्यात यावे, अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी रोजगार निर्मितीसाठी चंद्रपूर येथे नवे प्रकल्प येण्याची गरज व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादक जिल्हा असून भारताच्या मध्यभागी आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी असलेला हा जिल्हा आहे. येथे विपुल प्रमाणात जमीन, कोळसा आणि वीज आहे. त्यामुळे सुरजागड येथे मिळालेल्या लोहखनिजावर आधारित विविध स्टील उद्योग या जिल्ह्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिलांसाठी चांगली योजना सरकारने आणली आहे. त्यातच सरकार विधवा, निराधार, परित्यक्ता अशा 10 हजार महिलांना पिंक रिक्षा देणार आहे. मात्र खनिज निधीमधूनही सदर रिक्षा खरेदी करण्याचे प्रावधान करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. चंद्रपूरला घोषित झालेल्या टायगर सफारीचे काम गतीशील करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.