चंद्रपूर, दि. 2 : मूल तालुक्यामध्ये कृषीपंप जोडणीसाठी असलेल्या विद्युत तारा चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची तातडीने दखल घेऊन तारा चोरी करणाऱ्यांना ताब्यात घ्यावे आणि त्यांच्या कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस विभागाला दिले आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र लिहिले आहे.
मूल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून कृषीपंप वाहिनीच्या लघुदाब व उच्चदाब वाहिनीचे तार वारंवार चोरी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहिनीचे खांब खाली पडत असून महावितरण कंपनीचे तर नुकसान होतच आहे, शिवाय शेतकरीसुध्दा कृषीपंप जोडणीपासून वंचित राहात आहे. महावितरणद्वारे नवीन वाहिनी पुन्हा उभी करण्यास फार कालावधी लागत असल्याने सिंचनाअभावी शेतक-यांचे नुकसान होत आहे, याकडे श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आहे.
विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलिस विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन चोरांवर कठोर कारवाई करावी व चोरांचा बंदोबस्त करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.