चंद्रपूर:- भद्रावती येथील कर्नाटक एम्टा खानीच्या विरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागील आठवडयात विविध मागण्यांसंदर्भात गावकऱ्यासह आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या संदर्भात कर्नाटक एम्टा खानीच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांची पुर्तता करणे सुरु केले असून आज त्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांना नोकरी चे नियुक्ती पत्र देण्यात आले.
कर्नाटक एम्टा येथील खानीत अनेक शेतकऱ्यानी आपल्या जमीनी दिल्या परंतू अनेक शेतकऱ्याना आर्थिक मोबदला किंवा नोकरी मिळाली नव्हती. या संदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून वेळोवळी आंदोलने केली. चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडून आल्या नंतर या संदर्भात आंदोलन उभारुन संबंधीत कंपनी ला मागण्या पुर्ण करण्यासाठी धारेवर धरले. गावकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कोळसा खान बंद पाडली. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक एम्टा मधील संचालक मंडळ व गावकरी यांच्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बैठक घडवून आणली व तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी केली. या मागण्यांची पुर्तता झाली असून 15 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त म्हणून असणाÚया देवानंद उध्दव पुनवटकर या युवकाला नोकरीच्या नियुक्तीचे पत्र देऊन मागण्यांची पुर्तता करणे सुरु केले आहे. सदर युवकाची बंराज मोकासा येथील पावणे-तीन एकर शेती कंपनीने घेतली होती. लवकरच इतर मागण्यांवर देखील कर्नाटक एम्टातील संचालक मंडळ निर्णय घेणार असून जुलै अखेर पर्यंत सर्व मागण्या पुर्ण करणार असल्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानी आभार मानून आम्ही सदैव पाठीशी राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.