चंद्रपूर, दि.२४ – आमच्या काळातील पिढीवर शिक्षण घेताना जो ताण होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आजच्या पिढीवर आहे. आजची पिढी स्पर्धेच्या युगात धडपडत आहे. प्रत्येक गोष्ट वेगाने बदलते आहे. आम्ही शाळेत शिकायचो तेव्हा शिक्षक सांगायचे की बारा कोसावर भाषा बदलते. आजचे शिक्षक सांगतात की बारा दिवसांमध्ये तंत्रज्ञान बदलते. मुंबईत उद्योजकांच्या परिषदेत गेलो असता एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की, पूर्वी एक उद्योग सत्तर वर्षे एकाच तंत्रज्ञानाच्या आधारावर चालायचा, मात्र आता दरवर्षी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले नाही तर उद्योग चालत नाहीत. त्यामुळे या बदलत्या काळात आपण दररोज नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर येथील आर्य वैश्य स्नेह मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट अॉफ फंडामेंटल रिसर्च येथील शास्त्रज्ञ प्रो. डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष विजय गंपावार, सचिव नीरज पडगिलवार, कोषाध्यक्ष मनोज राघमवार, जयंत बोंनगीरवार, अभय निलावार, विलोक राचलवार, राजेश पत्तीवार, सागर मुक्कावार, राजेश्वर चिंतावार, शंकर गंगशेट्टीवार, अविनाश उत्तरवार, गिरीधर उपगन्लावार, वैभव कोतपल्लीवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणवंत विद्यार्थ्यांना आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हावे, असा आशीर्वाद कन्यका मातेकडे मागतो, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने, परीश्रमाने गुणपत्रिकेत गुणवंत हा शिक्का लावला आहे, याचा अभिमान आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाकडून या विद्यार्थ्यांचा गौरव केला जात आहे. मात्र प्रत्येक पावलावर गौरव होईल, समाजाला आपला अभिमान वाटेल, यादृष्टीने कष्ट घ्या. आपले हस्ताक्षर ऑटोग्राफमध्ये बदलले पाहिजे, एवढी भरारी घ्या,’ असे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
‘आई, आजी आणि शिक्षक आपल्याला अनके छोट्या छोट्या कथा सांगतात. त्या कथांचा मतितार्थ समजून घ्यावा. कारण त्यातूनच आपल्या जीवनाला दिशा मिळत असते. यशस्वी लोक वेगळे काम करीत नाही, ते वेगळ्या पद्धतीने काम करीत असतात. ज्याने बल्बचा शोध लावला त्या थॉमस अल्वा एडिसनला प्रयोग यशस्वी होण्यापूर्वी ५० हजार प्रयोग करावे लागले होते. त्यानंतर त्याचा प्रयोग यशस्वी झाला. बल्बचा शोध लागल्याची माहिती पत्रकारांना देत असताना एका पत्रकाराने प्रश्न केला की ‘५० हजार प्रयोग केल्यानंतरही यश आले नसते तर तुम्ही काय केले असते?’ त्यावर एडिसनने उत्तर दिले की ‘अपयश आले असते तर मी इथे तुमच्यापुढे बसलो नसतो, पुन्हा एकदा पुढच्या प्रयोगाची तयारी सुरू केली असती.’ आपले जीवन असे असले पाहिजे. न थांबता, हताश न होता, यशापयशाची चिंता न करता सदैव प्रामाणिक प्रयत्न करीत राहिले पाहिजे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार विद्यार्थ्यांना म्हणाले.
‘दहीहंडीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा’
एकदा एका माणसाने जहाजामध्ये खेकडा भरलेले टोपले ठेवले आणि त्यावर काहीच झाकले नाही. लोक म्हणाले झाकण लावा, नाहीतर खेकडे बाहेर येतील. त्यावर तो म्हणाला ‘हे सगळे महाराष्ट्रातील खेकडे आहे. ते एकमेकांचे पाय ओढतील आणि कुणालाही वर येऊ देणार नाही.’ ही कथा आपण ऐकली आहे, पण ही अर्धवट आहे. याच महाराष्ट्रात दहीहंडीसाठी लोक एकमेकांना आधार देतात आणि त्यांच्यातील एक जण हंडी फोडून सर्वांना प्रसाद देतो. हाच आदर्श आपल्याला डोळ्यापुढे ठेवायचा आहे आणि आयुष्याचा प्रवास करायचा आहे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.