चंद्रपूर,दि.२९ – चंद्रपूर येथे आकाराला येत असलेल्या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन देशगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे अशी इच्छा ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनद्वारा संचालित तसेच टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभे होत आहे. या हॉस्पिटलचे काम लवकरच पूर्णत्वास येणार असून त्याचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२४ च्या दरम्यान करण्याचा मानस पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. ‘केवळ चंद्रपूरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांमधील आणि तेलंगाणा, एकूणच मध्य भारतातील रुग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात आपली उपस्थिती एका उत्तम प्रयत्नांचा गौरव करणारी ठरेल. तसेच निरोगी व समृद्ध राष्ट्राच्या दृढ संकल्पाला अधिक बळ मिळेल,’ असे ना. मुनगंटीवार यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याचवेळी १५ अॉगस्ट किंवा त्याच्या आसपासचा कुठलाही दिवस आपण उद्घाटनासाठी दिल्यास आम्हाला आनंद होईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
‘चंद्रपूर तसेच मध्य भारतातील कॅन्सरच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांसह उपचार देण्यात येणार आहे. १४० खाटांनी सुसज्ज असे हे हॉस्पिटल गुणवत्तापूर्ण उपचारासाठी कटिबद्ध असणार आहे. कॅन्सरचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या जीवनात एक नवी आशा निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे,’ याचाही ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आवर्जून उल्लेख केला आहे.
*पंतप्रधानांच्या उद्दिष्टांवर कार्य*
आपल्या नेतृत्वात भारतातील आरोग्य सेवेमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारी यंत्रणा आपण निर्माण केली आहे. कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या पावलांवर पाऊल टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
*पंतप्रधानांच्या नेतृत्वात आरोग्य सेवेचा कायापालट*
आयुष्मान भारत योजना, पीएम-जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून आपण देशातील १० कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना आरोग्य विम्याचा लाभ मिळवून दिला आहे. आपल्या नेतृत्वात हेल्थ आणि वेलनेस सेंटर्सचा विस्तार, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेद्वारा जेनेरिक ड्रग प्रमोशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, टेलिमेडिसीन व डिजीटल आरोग्य, कोविड -१९ लसीकरण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजना आदी क्षेत्रात प्रभावी कार्य झाले आहे. याशिवाय २२ नव्या एम्स संस्थानांना मंजुरी आणि ६९२ पेक्षा अधिक मेडिकल कॉलेजेसचे निर्माण आपल्या नेतृत्वात झाले आहे, याचाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.