चंद्रपूर: २९- आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल पाच वर्षापासून रखडलेली 20 आदिवासी जोडप्यांची कन्यादान योजनेची आर्थिक मदत अदा करण्यात आली आहे. 2018 पासून सदर जोडप्यांना योजनेच्या आर्थिक मदतीपासुन वंचित ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या अंतर्गत कन्यादान योजनेच्या अनुषंगाने शहिद बाबूराव शेडमाके संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात 20 आदिवासी जोडपे विवाहबध्द झाले होते. सदर योजनेंतर्गत या जोडप्यांना 10 हजार रुपये आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र आदिवासी विकास विभागाच्या विसंवाद व त्रुट्यांमूळे सदर लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले होते. सदर बाब यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्दशनास आणून दिली. सोबतच जितेश कुळमेथे यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांसह विवाह सोहळ्याच्या आयोजकांची एक बैठक घडवून आणली.
त्यानंतर सदर अनुदान तात्काळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आदिवासी विकास विभागाला केल्या होत्या. विशेष म्हणजे 2018 पासून सदर लाभार्थ्यांचे अनुदान रखडवून ठेवण्यात आले होते. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी रोष प्रकट करत पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर सर्व लाभार्थ्यांचे प्रत्येक 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तब्बल 5 वर्षा नंतर ही राशी त्यांना मिळाल्याने त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे.