चंद्रपूर, दि. 28 : 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पडोली येथे दिनांक 4 जून 2024 रोजी पार पाडली जाणार असून मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2 ) मधील कलम 144 व 144(1)(3) लागू करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 4 जून रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्राच्या बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील सर्व दुकाने / आस्थापना व्यवसाय केंद्र बंद राहतील. मतमोजणी केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची वाहने, पोलीस विभाग, विद्युत विभाग,अग्नीशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल.
भारत निवडणूक आयोगाचे वतीने वितरीत केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंध असेल. मतमोजणीच्या दिवशी केंद्राच्या बाहेरील 100 मीटर परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहात जमा होण्यास प्रतिबंध असेल. उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल. परंतू प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल.
मतमोजणी केंद्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पडोलीच्या सभोवताल 1कि.मी. चे क्षेत्रात /परिसरात ड्रोन वा ड्रोन सद्दश्य वस्तु (Flying Objects) उडविण्यास 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या आदेशात नमुद आहे.