चंद्रपूर २२ मे – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरिकांना यापुढे विविध दाखले तसेच परवाने घेण्यास पालिकेत जाण्याची गरज पडणार नाही. पालिकेने एकूण ५८ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी सेवा हमी कायदा (राईट टू सर्व्हिस) संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करून विहित दिवसात घरबसल्या दाखले, प्रमाणपत्र आणि परवान्या मिळणार आहे.
या ऑनलाईन सेवेत जन्म- मृत्यू,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,मालमत्ता कर,मालमत्ता हस्तांतरण नोंद,स्वयंमुल्यांकन,नविन नळजोडणी,मालकी हक्कात बदल, प्लंबर परवाना,मिटर तक्रार,पाण्याची गुणवत्ता तक्रार,ना हरकत प्रमाणपत्र,अग्निशमन ना-हरकत दाखला,व्यवसाय परवाना,जाहिरात किंवा आकाशचिन्ह परवाना, चित्रीकरण परवानगी परवाना इत्यादी प्रमुख सेवांचा समावेश आहे.
या सुविधांचा ऑनलाईन वापर करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेच्या rts.cmcchandrapur.com या पोर्टलवर भेट द्यावी. पहिल्यांदाच वापर करत असल्यास आपले नाव व इतर माहिती रजिस्टर करावी व त्यानंतर या सर्व सुविधांचा वापर करता येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप चॅटबॉटचा वापर करूनही या सुविधांचा लाभ घेता येतो. मनपाच्या व्हॉट्सॲप नंबर (8530006063) वर “Hi” टाईप करून पाठविले तर, पुढील माहिती आपोआप येणे सुरु होते. नागरिकांना केवळ व्हॉट्सॲपवर मिळालेल्या सूचनांना प्रतिसाद द्यावयाचा असतो.
ऑनलाईन सुविधांचा वापर करून वेळ व पैसा दोघांचीही बचत होत असल्याने सर्व नागरिकांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.