चंद्रपूर दि. 31 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. या पार्श्वभुमीवर गत निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मिळालेली मते व इतर बाबी अभ्यासण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पूर्वपीठिका – 2024 ची निर्मिती करण्यात आली आहे. या पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
पूर्वपीठिका – 2024 मध्ये सन 1951 ते 2019 या कालावधीतील विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती, निवडणूक यंत्रणेशी संबंधित महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, आदर्श आचारसंहितेतील ठळक बाबी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान ‘काय करावे’ किंवा ‘काय करू नये’ याबाबत माहिती, जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या, मतदान केंद्र, निवडणुकीचा कार्यक्रम आदी माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.