‘चैत्र चाहूल’चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर! जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जाहीर!

0
16

 

मुंबई:-‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ध्यास सन्मान’ या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेले जेष्ठ लोक कलावंत मनोहर गोलांबरे यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

‘चैत्र चाहूल’तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष ‘ध्यास सन्माना’चे यंदाचे १७ वे वर्षे आहे. या सन्मानाचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रूपये पंचवीस हजार असे असून येत्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मराठी नववर्ष दिनी होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ भाषा अभ्यासक राजीव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजक विनोद पवार व महेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

 

‘चैत्र चाहूल’मध्ये यंदा ‘हॅलो इन्स्पेक्टर’ ही ‘सवाई गंधर्व’ मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेली एकांकिका सादर होणार असून शाहीर रामानंद उगले आणि सहकलाकार यांचा ‘महाराष्ट्राची लोकगाणी’ हा लोकसंगीताचा विशेष कार्यक्रम खास जालना येथून मुंबईतील मराठी रसिकांसाठी निमंत्रित केला आहे.

मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, वीर सावरकर नाट्यगृह शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे ‘चैत्र चाहूल’चा हा सोहळा संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी विनामूल्य असून काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क : महेंद्र पवार – 98692 87870

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here