कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल
चंद्रपूर शहाराने अनुभवली ऐतिहासिक गर्दी
चंद्रपूर, 26 मार्च 2024 – जात-पात धर्माचा विचार न करता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही जातीय आमिषांना किंवा भावनिक आवाहनांना बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देशाच्या विकासासाठी असलेल्या या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात,’ या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी, 26 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,आमदार डॉ. संदीप धुर्वे, सौ. सपनाताई मुनगंटीवार, राजेंद्र गांधी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, यांच्यासह महायुतीतील व घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘सुधीर भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘अब की बार 400 पार’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशगौरव मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी विश्वास दाखवत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याची संधी दिली. आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ‘आशीर्वाद यात्रेत’ हजारों लोकांचा आशीर्वाद प्राप्त केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार, माजी आमदारांसह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आणि मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या.
तुलना करायचीच असेल तर विकासाची, प्रगतीची करा. मी आजपर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे. मी जर निवडून आलो तर नवकल्पनांच्या माध्यमातून वार्ड, प्रभाग, गाव, शहर यांच्या विकासासाठी पूर्ण शक्तिनिशी प्रयत्न करील. तुमचा आशीर्वाद मला भारताला भूकमुक्त, आतंकमुक्त, विकासयुक्त तसेच भारताच्या गौरव वाढविण्यासाठी पाहिजे आहे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.