चंद्रपूर:- जवळपास एक वर्षे होत आले आहे मात्र गोंडवाना विद्यापीठ, पी.एचडी. विभागात ज्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांचे शोधप्रबंध सबमिट केलेले आहेत, त्यांची RRC अद्याप लागलेली नाही. विद्यापीठात शोधप्रबंध सबमिट करून देखील पुढील प्रक्रियेसाठी त्यांना तात्काळत बसावे लागत आहे. त्यामुळे शोधप्रबंध सादर केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची RRC त्वरीत घ्या व पुढील प्रक्रिया गतिमान करा; अन्यथा विद्यापीठात धरणे आंदोलन करू, असा इशारा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवा सेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोखारे यांना एका निवेदनातून दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार जवळपास १०० हुन अधिक संशोधक विद्यार्थी आहेत की ज्यांनी विद्यापीठातील पी.एचडी. विभागात शोधप्रबंध सादर केलेले आहे. आधीच संशोधक विद्यार्थी हा तीन ते चार वर्षे शोधकार्यात घालवितो. त्यानंतर शोधप्रबंध सबमिट केल्यानंतर देखील RRC, शोधप्रबंध एक्स्पर्ट कडे पाठविणे, अभिप्राय मागविणे, अंतिम व्हायवा आदी प्रक्रियेत बराच कालावधी जातो. विद्यापीठात शोधप्रबंध सबमिट केल्यानंतर सहा महिन्याहुन अधिक काळ हा पी.एचडी. अवॉर्ड नोटीफिकेशन निघण्याकरीता लागतो. या प्रक्रियेत गतिमानता नाही. परिणामी संशोधक विद्यार्थ्याला पी.एचडी. अवॉर्ड होण्यास वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या नोकरीच्या संधी हिरावल्या जातात व संशोधक विद्यार्थी हा महाविद्यालयात नोकरीस असल्यास त्याला मिळणारे प्लेसमेंट व इनक्रिमेंट ला विलंब होतो. या सर्व बाबींचा अत्यंत गांभीर्याने विद्यापीठ व फॅकल्टी हेड यांनी विचार करायला हवा, असे निवेदनात म्हटले आहे. व विद्यापीठात शोधप्रबंध सबमिट झाल्यानंतरची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी आहे.
सदर कार्यप्रणाली गतीमान न केल्यास व लांबलेली RRC ची तारीख त्वरीत जाहीर न केल्यास, सर्व संशोधक विद्यार्थ्यांना घेवून विद्यापीठात धरणे आंदोलन करू, व होणाऱ्या त्रासास आपण स्वतः जवाबदार असाल, असा निर्वाणीचा इशारा प्रा. निलेश बेलखेडे यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
याबाबत गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगूरू, प्र-सचिव परिक्षा नियंत्रक अधिकारी, यांना सुध्दा प्रतिलिपी देण्यात आल्या आहेत.