राज्य सरकारचे टपाल तिकिटांमधून राष्ट्रपुरुषांना अभिवादन! वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

0
14

 

 

मातृतीर्थावर राजमाता जिजाऊ यांच्यावरील टपाल तिकिटाचे विमोचन.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रयतेची सेवा करण्याचा संकल्प देणारा.

सिंदखेडराजा दि.12- डाक विभागाच्या इतिहासात आजपर्यंत कधीही शक्य झाले नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊर्जेमुळे शक्य झाले. ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांवरील टपाल तिकीट अवघ्या सहा दिवसांत प्रकाशित करण्याचा विक्रम झाला. त्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक विभागाने शहाजी राजांवर, आज राजमाता जिजाऊंवर टपाल तिकीट काढले. आता पुढील महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांवरील टपाल तिकीट प्रकाशित होणार आहे. राज्य सरकार टपाल तिकिटांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना अभिवादन करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) केले.

 

सिंदखेडराजा येथील मातृतीर्थावर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिआऊ यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विमोचन झाले. यावेळी राज्याचे सहकार मंत्री तसेच बुलढाण्याचे पालकमंत्री ना. श्री. दिलीप वळसे पाटील, सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, खामगावचे आमदार अॅड. आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश भांटे, माजी आमदार विजयराज शिंदे, संभाजीनगरचे पोस्ट मास्टर जनरल अदनान अहमद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, सिंदखेडराजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर धर्मसंस्कार केले, त्यांना युद्धनिती शिकवली. या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगाला रयतेची सेवा करण्याचा संकल्प देणारा ठरला. जगाला जाणता राजा देणाऱ्या सिंदखेडला आणि मातृतीर्थाला माझे कोटी कोटी नमन.’ सिंदखेडराजाचा विकास आराखडा लवकरात लवकर मंजूर होऊन गुणवत्तापूर्ण विकासकामे होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने अनेक उपक्रम राबविले आणि अनेक निर्णय देखील केले. ज्या क्रूर अफजलखानाचा महाराजांनी वध केला, त्याची कबर बांधून केलेले अतिक्रमण सरकारने तोडले. आता त्याच ठिकाणी शिवाजी महाराज वाघनखांनी अफजलखानाचा वध करतानाचे शिल्प उभारण्याचा निर्धार आम्ही केला आहे. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे देखील ब्रिटनवरून भारतात येणार आहेत.

 

आम्ही पुणेकर आणि राज्य सरकारच्या वतीने भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या दिशेने तलवार घेऊन असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या सोहळ्याला दीड हजारांहून अधिक भारतीय जवान उपस्थित होते,’ असेही ना श्री. मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here